Monday 2 August 2021

सिंधूला रिटायर करा - खोडसाळ टाईम्स

खो. टा. विशेष संपादकीय

'देवाला रिटायर करा' या श्रीराम लागूंच्या खळबळजनक विधानाप्रमाणेच 'पी. व्ही. सिंधूला रिटायर करा' अशी खळबळजनक पोस्ट पंढरीपांडे यांनी केली आणि अवघे फेसबुक खवळले.

या बाबतीत मत जाणून घ्यायला आम्ही (म्हणजे मीच, आम्ही आदरार्थी म्हणतो) सर्वात आधी पी. व्ही. सिंधूचे पूर्वाश्रमीचे बॅडमिंटन कोच पी. गोपीचंद यांना फोन लावला.

"तिने रिटायर का म्हणून व्हायचं? रिटायर व्हायचं तर पवारांनी व्हावं. सिंधूने पदक जिंकलं याचा भारताला अभिमानच आहे. मोदींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे."

"कोण मोदी? तिचे सध्याचे कोच?" आम्ही कन्फ्युज झालो.

"कोण मोदी? अरे, तुम्ही पेट्रोलपंपावर गेला नाहीत का कधी?"

इतक्यात आमचे उपसंपादक शहाणे आले. ते हळू आवाजात म्हणाले,

"तिचे कोच पी. गोपीचंद वेगळे, तुम्ही फोन लावलाय तो पडळकरांना" 

आम्ही ताबडतोब फोन ठेवून दिला. ओरिजिनल पी. गोपीचंद यांचा नंबर मिळवून त्यांना फोन लावला. पण ते बिझी होते त्यामुळे त्यांचे मत घेता आले नाही. 

मग या बाबतीत तरुण बॅडमिंटन खेळाडूंना काय वाटते हे जाणून घ्यायला आम्ही बाहेर पडलो. आमच्या ऑफिसकडून दोन गल्ल्या क्रॉस केल्या की 'फिनिक्स इंटरनॅशनल बॅडमिंटन सेंटर, मानखुर्द' आहे. तेथे एका कोर्टवर दोन तरुणांची शानदार मॅच सुरू होती. ब्रेक टाईम मध्ये आम्ही त्यातल्या एकाला भेटलो. पंढरीपांडेंच्या पोस्टवर त्याचं मत विचारलं. 

"हू इज धिस पॅन्ढ्री पांडे?" तो म्हणाला.

"ही इजे ज्येष्ठ जर्नालिस्ट" आम्ही त्याला सरांचा डीपी दाखवला. 

"लोल! ही इज सच अ बूमर!" 

एवढं बोलून तो खेळायला निघून गेला. आता पॅन्ढ्री पांडे - सॉरी - पंढरीपांडेंसारख्या ज्येष्ठ पत्रकारांना तो बूमर का म्हणाला ते आम्हाला कळले नाही. कदाचित बूमर च्युइंगगम प्रमाणे त्यांच्या पोस्टविषयी फेसबुकवर दिवसभर चर्वितचर्वण झाल्याने म्हणाला असेल.

 

ऑफिसात परतलो तेव्हा शहाणेंनी वेगळीच बातमी दिली. 'कळंबोली बहुद्देशीय महिला बचतगटा'तर्फे पंढरीपांडे यांचा शाल, श्रीफळ देऊन जाहीर सत्कार होणार होता म्हणे.

"कशाबद्दल सत्कार?" आम्ही विचारले.

शहाणेंनी सांगितले, 

"एकच नाही; आणखी दहा-बारा बचतगटांनी त्यांचा ठिकठिकाणी सत्कार आयोजित केला आहे. चाळिशीतल्या महिलांची चपळता पी. व्ही. सिंधूसारखी असते हे समजल्यापासून चाळिशीतला सगळा महिलावर्ग पंढरीपांडेंवर खुश झालेला आहे."