Monday 17 May 2010

अचाट मोदी



सॉलिड बातमी होती आज सगळ्या पेपरांत. BCCI च्या 'कारणे दाखवा' नोटीसला मोदी यांनी बारा हजार पानी उत्तर दिले. खरंच अचाट ईसम आहे हा मोदी ! ३५ पानांच्या नोटीसला एवढं मोठं उत्तर ? इकडे मराठीच्या तासाला संदर्भासाहित स्पष्टीकरणाला १०-१२ ओळी लिहिताना आमची बोंबाबोंब व्हायची अन् हे बेणं पाठवतंय खोकिच्या खोकी भरून उत्तर !

आता केकता कपूर--सॉरी--एकता कपूरला नवीन सीरियल सुरू करण्याची नामी संधी आहे. 'कहानी क्रिकेट किंग की' (यातल्या क्रिकेटचं स्पेलिंग 'Kricket' बरं का) या नावाने सीरियल जाहीर करायची आणि त्यात ललित मोदींची 'छोटिशी' मुलाखत घ्यायची. १२००० हजार पानी उत्तरं देण्याची सवय असणार्‍या मोदींची ती मुलाखत रोज डेली सोपच्या धर्तीवर दाखवल्यास किती दिवस सुरू राहील याचा हिशोब करा !

बाकी ते उत्तर खरंच एवढं मोठं नसणार. मजकुराची लांबी वाढवायची ती जुनीच आयडिया आहे. त्यात लिहिलं असेल, "आम्ही बॉल खरेदी केले. त्याची क्वालिटी तपासण्यासाठी त्याचे टप्पे पाडून पाहिले. टप्पे असे पडले--टप टप टप टप....टप टप टप टप.....टप टप टप टप.....टप टप टप टप.....एन्"

बरोबर ना ?

Saturday 15 May 2010

फाजिती

हा ब्लॉग सुरू केला तेव्हा उत्साहाने ब्लॉगवर साइट काउंटर टाकले होते. अर्थात फ्री काउंटर असल्याने त्या काउंटर देणार्‍या साईट ची लिंक त्याला होती. पण तेव्हा असलेल्या HTML च्या थोड्याफार माहितीवरून त्या कोड मधे काडी करून ती लिंक मी काढून टाकली. म्हटलं कोणाच्या तातश्रींना कळतंय ?

मग प्रत्येक पोस्ट नंतर काउंटर वर वाढत जाणार्‍या संख्येकडे पाहायला अभिमान वाटायचा. आपलं लिखाण (खूपच पांचट असूनही) कोणीतरी वाचतय ही गोष्ट मनाला सुखवायची. त्या काउंटर चा 'अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा' होताना पाहायची उत्सुकता होती.

आणि एके दिवशी घात झाला. फ्री काउंटरवाल्यांना कसे कोण जाणे माझी लबाडी समजली. त्या दुर्दैवी सकाळी ब्लॉग पहिला तर काउंटर दिसेना. त्या जागी Account Suspended. No Link Found असा रूक्ष मेसेज !

मग आज परत काउंटर लावायचा ठरवलाय. ब्लॉग वर अतपर्यंतच्या नोंदी आहेत १७ (अरेरे! एवढ्याच ?). म्हणजे एका नोंदीला किमान तीस जणांनी भेटी दिल्या असं म्हटलं तर संख्या होते सतरा त्रिक चोपन्न-नव्हे-एक्कावन वर एक शून्य = ५१०. आणि आधीच्या काउंटर ने ५०० चा आकडा क्रॉस केलेला नक्की आठवतोय. सो आता हा काउंटर ५१० पासूनच सुरू करतो.

Thursday 13 May 2010

बावळट प्रश्न आणि हुशार उत्तर !

हा टॉपिक आधी उल्लेखलेल्या 'मराठी विनोद कम्युनिटी' मधलाच. 'प्रशांत' यांनी हा टॉपिक सुरू केला आहे
अनेकदा लोकं असे प्रश्न विचारतात जे अतिशय मुर्खपणाचे असतात... अशा प्रश्नांना दिलेली ही हटके उत्तर आहेत.
पहा काही नमुने :

हॉटेल मध्ये अनेक जण वेटर ला 'इथे जेवण कसं मिळतं' हे विचारतात.... आता तो काय वाईट मिळत म्हणून सांगणार ? तरी असलाच एखादा इरसाल वेटर तर.....

गिर्हाईक: इथे पनीर मसाला चांगला मिळतो का हो ?
वेटर: छे !! बांधकामावरच सिमेंट आणुन कालवतो ते आम्ही त्यात...कसला चांगला लागतोय

या टॉपिक मधे रश्मिन यांनी मस्त नमुने दिले आहेत:

प्रश्न- अरे वा! घरीच आहात वाटतं?
उत्तर- नाही माझ्या पश्चात ही इमारत "राष्ट्रिय वास्तु" घोषित झाली तर कसे वाटेल हे बघायला आलोय

सकाळी.
प्रश्न - पेपर वाचताय वाटतं!
उत्तर- नाही! ओल्या शाईचा (इंक) वास घेतल्या शिवाय मला ताजेतवाने वाटत नाही.

सिनेमागृहा बाहेर
प्रश्न: काय पिक्चर बघायला आलात वाटतं?
उत्तर: छे! फावल्या वेळात तिकिटे "ब्लैक" करून अर्थार्जन करावं म्हणतोय! पण! इथेही तुम्ही आमच्या "आधी" हजर!!

सकाळी फिरायला निघाला आहात
प्रश्न: काय "मोर्निंग वाक्" वाटतं??!!!
उत्तर: काही तरी काय! नगरपालिकेचं कंत्राट घेतलय मैलाचे दगड कुणी पहाटे चोरून तर नेत नाही ना याची खात्री करतोय!!

प्रश्न- प्रवासाला निघालात वाटतं? (हातात लगेज बघून !!!!)
उत्तर- नाही हल्ली व्यायाम करायला सवड मिळत नाही ना! शिवाय जिम चे पैसे ही वाचतात !!

Wednesday 5 May 2010

Orkut वरील 'मराठी विनोद' कम्युनिटी

सध्या orkut वर लॉग इन झाल्यावर मी सगळ्यात पहिल्यांदा भेट देतो ते 'मराठी विनोद' या कम्युनिटीला. त्याशिवाय पुढचं orkut सर्फिंग चांगलं जात नाही. ह्या कम्युनिटिचं सभासदत्व मी खूपच आधी घेतलं होतं. तेव्हा फक्त एक दोन वेळा भेट दिली असेन. पण ही कम्युनिटी माझ्या orkut सर्फिंग चा कायमचा भाग झाली ते या एप्रिल पासून.
त्याचं झालं असं की आमची सेमिस्टर परीक्षा तोंडावर आली होती. 'सी प्रोग्रामिंग' (एक भयंकर विषय) ची थियरी वाचून वाचून वैताग आला होता. म्हणून orkut लॉग इन झालो. मग सहज लक्ष गेलं आणि 'मराठी विनोद' ला भेट दिली.
तिथले मस्त जोक्स, गेम्स, वाचून डोकं एकदम फ्रेश झालं. आता रोजच्या रोज तिथे भेट दिल्याशिवाय राहवत नाही. या कम्युनिटी ला भेट दिल्यावर तुम्ही पण जाम खूष व्हाल.
Ram Indulkar यांनी सुरू केलेली ही कम्युनिटी http://www.orkut.co.in/Main#Communitycmm=21132317 या पत्त्यावर आहे.
इथे सगळेच टॉपिक मस्त आहेत. धम्माल ''मजेशीर'' ई- मेल आय-डी सुचवा , चला भांडुया, Phone Call, वरील व्यक्तीच्या Profile मधीलBestगोष्ट, हे आणि असे अनेक गेम्स खेळूनच नव्हे....तर नुसते वाचूनही मजा येते. आणि वेगवेगळे जोक्स चे फोरम तर मस्तच आहेत. सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका, बावळट प्रश्न आणि हुशार उत्तर, मजेदार मोबाइल संदेश, राम इंडुलकरांचे जोक्सचे फोरम्स, उखाणा, --- नावं देता देता मोठी लिस्ट होईल.
मराठी विनोद चे नेहमीचे सभासदही आता खूप वर्षांपासूनची ओळख असल्यासारखे वाटू लागले आहेत. तुम्ही पण एकदा भेट देऊन पहा. मूड फ्रेश व्हायला मदत होईल.

Monday 3 May 2010

उड जावे चिडिया भुर्रर...

नशेत बिल्डिंग वरुन पडल्यामुळे तळीरामला हॉस्पिटल मधे अड्मिट केले होते. त्याचा मित्र दुसर्‍या दिवशी भेटायला आला.

"अरे काल काय झाल रे ? मला काहीच आठवत नाही" तळीराम म्हणाला.

त्याचा मित्र सांगू लागला,

"अरे, काल आपण सगळे त्या पक्याच्या घरी टेरेस वर पीत बसलो नव्हतो का... तेव्हा तू म्हणालास आता मी चिमणीसारखा भुर्रर उडून जातो...आणि उडी मारलीस..."

"मूर्खा, मग मला थांबवायच होतस ना !" तळीराम डाफरला.

"पण मला तेव्हा वाटलं तू सहज उडत जाशील म्हणून..."

Sunday 2 May 2010

चायनीज ??

स्थळ : मुंबईतला तसा कमी गर्दीचा बसस्टॉप.
वेळ : अशीच.....निवांत.
पात्रे : दोन मनुष्य.




मनुष्य क्रमांक एक : तुम्ही चायनीज आहात का हो ?
मनुष्य क्रमांक दोन : नाही. इथलाच आहे मी.

(थोड्या वेळाने)

मनुष्य क्रमांक एक : सांगा ना तुम्ही चायनीज आहात का ?
मनुष्य क्रमांक दोन : (त्रासून) सांगितल ना एकदा...नाही.

(परत थोड्या वेळाने)

म.क्र. एक : सांगा ना तुम्ही चायनीज आहात का ?
म.क्र. दोन : (रागावून) अहो काय हे.......नाहीए मी चायनीज किती वेळा सांगू ??

(परत अजुन थोड्या वेळाने)

म.क्र. एक : खरं सांगा.....चायनीज आहात ना ?
म.क्र. दोन : (किंचाळून) हो....आहे मी चायनीज. बोला....
म.क्र. एक : काहीतरीच सांगताय.....चायनीज म्हणे.....चेहे-यावरून अजिबात वाटत नाही !!