Saturday, 23 April 2011

जागतिक ग्रंथ दिन

सकाळीच अण्णा भेटले. हजारे नव्हेत, आमच्या बिल्डींग मधले ('सी' विंग, तळमजला, फ्लॅट क्र.२) अण्णा. हातात पिशवी होती. नेहमीप्रमाणे 'शुभप्रभात' न म्हणता "शुभेच्छा" म्हणाले.
"कसल्या ?" मी विचारलं.
"अरे आजोब्या," (अण्णांच स्वत:च वय ६०+ आहे. माझ्यापेक्षा निदान बेचाळीस वर्ष तरी जास्त. पण निव्वळ त्यांच्यासोबत सकाळी जॉगिंग ला जात नाही म्हणून मला 'आजोब्या' म्हणतात.)
"पेपर वाचतोस की नाही ? आज जागतिक ग्रंथ दिन आहे !" अण्णांचं वाचनवेड बिल्डींगजाहीर आहे.
"अच्छा ! म्हणून सकाळी सकाळी खरेदी का ?" मी त्यांच्या हातातल्या पिशवीकडे बघत विचारलं.
"हो, बघ तर" त्यांनी पिशवीतून काढलेली दोन पुस्तकं माझ्याकडे दिली.
पुस्तकं विचित्र होती. मुखपृष्ठ - मलपृष्ठ दोन्ही स्वच्छ पांढरी. कोणतंही चित्र नाही की लेखकाचं नाव नाही. फक्त प्रकाशनाचं नाव होतं. मला वाटलं असेल काही प्रयोग बियोग, पण आत पाहतो तर सगळी पानं कोरी ! फक्त पहिल्या दोन पानांवर अनुक्रमे 'प्रस्तावना' आणि 'मनोगत' एवढं शीर्षक लिहिलेलं. बाकी तीन- चारशे नुसत्या कोर्‍या पानांचं ते बाड होतं.

"हे काय आहे ?"
"अरे हाच तर साहित्यातला नवा प्रवाह आहे !" अण्णा सांगते झाले, "मराठी, इंग्रजी - सगळ्या साहित्यात आता हाच प्रवाह सुरू आहे. एक दोन वर्षात बघ सगळी कडे हीच पुस्तकं दिसतील."
"म्हणजे आपण अशी कोरी पानं विकत घ्यायची ?"
"हो ! कोर्‍या पानांवर आपण आपलं पुस्तक लिहायचं. आपलीच प्रस्तावना. आपणच वाचक."
"का ?"
"मला पण हाच प्रश्न पडला होता, पण त्या रघूने (अण्णा नेहमी ज्याच्याकडून पुस्तक घेतात तो दुकानदार) खुलासा केला. अरे, आताची पद्धत जुनाट झाली. एक माणूस लिहिणार, ते इतर लोक वाचणार. ते लिहिलेलं काही लोकांना आवडणार, काहींना नाही. काहींच्या भावना दुखावल्या जाणार. त्यामुळे ते निषेध, जाळपोळ करून भावना सुखावण्याचा प्रयत्न करणार. मग काही लोक पुस्तकावर आपापली सेन्सॉरशिप लाद्णार. लेखक जर सामाजिक कार्यक्रमाच्या महत्वाच्या पदी असेल तर राजीनामा द्यायला लावणार. कशाला ही झन्झट हवी ? म्हणून ही नवी पुस्तकं ! आपल्याला हवं ते लिहा नि मनसोक्त वाचत बसा !" अण्णांवर रघूचा प्रभाव पडलेला दिसत होता.

मात्र नुकताच त्यांचा भ्रमनिरास झाला. ती पुस्तकं म्हणजे काही नसून कंपनी कडून आलेल्या, 'रूल्ड' न झालेल्या डिफेक्टेड वह्या होत्या. दोन वह्या कुठे परत पाठवणार म्हणून रघूने अण्णांची थोडी गंमत केली. संध्याकाळी त्याने बंटीच्या (अण्णांचा नातू) हाती पैसे परत पाठवले. ("रघू दादा सॉरी पण म्हणत होता" - इति बंटी)

मात्र अण्णा चिडलेले दिसले नाहीत. "रघूला डोकं आहे म्हणजे" असं म्हणत होते.

ता. क. :- त्यांनी सगळ्या मराठी ब्लॉगिष्टांना शुभेच्छा द्यायला सांगितल्यात. बंटीने नेट शिकवल्यापासून ते रोज ब्लॉग वाचतात. "आज कॉपीराइट दिन सुद्धा आहे. तुझ्या त्या ब्लॉग विश्व वाल्यांना काळजी घ्यायला सांग." - इति अण्णा. महेन्द्र काका आणि कांचन ताईने लिहिलेलं बोक्या सातबंडे प्रकरण वाचल्यापासून अण्णा कमालीचे सजग बनलेत.


4 comments: