Thursday, 9 June 2011

जनरेशन गॅप

जनरेशन गॅपचं एक ठळक उदाहरण

आमिर खान :
पापा केहते है, बडा नाम करेगा
बेटा हमारा ऐसा काम करेगा



इम्रान खान:
डॅडी मुझसे बोला, तू गलती है मेरी
तुझपे जिंदगानी गिल्टी है मेरी

(फोटो श्रेय : गूगल इमेजेस)
[पी.जे श्रेय: एस.एम.एस :D :D ]

Saturday, 23 April 2011

जागतिक ग्रंथ दिन

सकाळीच अण्णा भेटले. हजारे नव्हेत, आमच्या बिल्डींग मधले ('सी' विंग, तळमजला, फ्लॅट क्र.२) अण्णा. हातात पिशवी होती. नेहमीप्रमाणे 'शुभप्रभात' न म्हणता "शुभेच्छा" म्हणाले.
"कसल्या ?" मी विचारलं.
"अरे आजोब्या," (अण्णांच स्वत:च वय ६०+ आहे. माझ्यापेक्षा निदान बेचाळीस वर्ष तरी जास्त. पण निव्वळ त्यांच्यासोबत सकाळी जॉगिंग ला जात नाही म्हणून मला 'आजोब्या' म्हणतात.)
"पेपर वाचतोस की नाही ? आज जागतिक ग्रंथ दिन आहे !" अण्णांचं वाचनवेड बिल्डींगजाहीर आहे.
"अच्छा ! म्हणून सकाळी सकाळी खरेदी का ?" मी त्यांच्या हातातल्या पिशवीकडे बघत विचारलं.
"हो, बघ तर" त्यांनी पिशवीतून काढलेली दोन पुस्तकं माझ्याकडे दिली.
पुस्तकं विचित्र होती. मुखपृष्ठ - मलपृष्ठ दोन्ही स्वच्छ पांढरी. कोणतंही चित्र नाही की लेखकाचं नाव नाही. फक्त प्रकाशनाचं नाव होतं. मला वाटलं असेल काही प्रयोग बियोग, पण आत पाहतो तर सगळी पानं कोरी ! फक्त पहिल्या दोन पानांवर अनुक्रमे 'प्रस्तावना' आणि 'मनोगत' एवढं शीर्षक लिहिलेलं. बाकी तीन- चारशे नुसत्या कोर्‍या पानांचं ते बाड होतं.

"हे काय आहे ?"
"अरे हाच तर साहित्यातला नवा प्रवाह आहे !" अण्णा सांगते झाले, "मराठी, इंग्रजी - सगळ्या साहित्यात आता हाच प्रवाह सुरू आहे. एक दोन वर्षात बघ सगळी कडे हीच पुस्तकं दिसतील."
"म्हणजे आपण अशी कोरी पानं विकत घ्यायची ?"
"हो ! कोर्‍या पानांवर आपण आपलं पुस्तक लिहायचं. आपलीच प्रस्तावना. आपणच वाचक."
"का ?"
"मला पण हाच प्रश्न पडला होता, पण त्या रघूने (अण्णा नेहमी ज्याच्याकडून पुस्तक घेतात तो दुकानदार) खुलासा केला. अरे, आताची पद्धत जुनाट झाली. एक माणूस लिहिणार, ते इतर लोक वाचणार. ते लिहिलेलं काही लोकांना आवडणार, काहींना नाही. काहींच्या भावना दुखावल्या जाणार. त्यामुळे ते निषेध, जाळपोळ करून भावना सुखावण्याचा प्रयत्न करणार. मग काही लोक पुस्तकावर आपापली सेन्सॉरशिप लाद्णार. लेखक जर सामाजिक कार्यक्रमाच्या महत्वाच्या पदी असेल तर राजीनामा द्यायला लावणार. कशाला ही झन्झट हवी ? म्हणून ही नवी पुस्तकं ! आपल्याला हवं ते लिहा नि मनसोक्त वाचत बसा !" अण्णांवर रघूचा प्रभाव पडलेला दिसत होता.

मात्र नुकताच त्यांचा भ्रमनिरास झाला. ती पुस्तकं म्हणजे काही नसून कंपनी कडून आलेल्या, 'रूल्ड' न झालेल्या डिफेक्टेड वह्या होत्या. दोन वह्या कुठे परत पाठवणार म्हणून रघूने अण्णांची थोडी गंमत केली. संध्याकाळी त्याने बंटीच्या (अण्णांचा नातू) हाती पैसे परत पाठवले. ("रघू दादा सॉरी पण म्हणत होता" - इति बंटी)

मात्र अण्णा चिडलेले दिसले नाहीत. "रघूला डोकं आहे म्हणजे" असं म्हणत होते.

ता. क. :- त्यांनी सगळ्या मराठी ब्लॉगिष्टांना शुभेच्छा द्यायला सांगितल्यात. बंटीने नेट शिकवल्यापासून ते रोज ब्लॉग वाचतात. "आज कॉपीराइट दिन सुद्धा आहे. तुझ्या त्या ब्लॉग विश्व वाल्यांना काळजी घ्यायला सांग." - इति अण्णा. महेन्द्र काका आणि कांचन ताईने लिहिलेलं बोक्या सातबंडे प्रकरण वाचल्यापासून अण्णा कमालीचे सजग बनलेत.


Saturday, 6 November 2010

बोगस फटाके वितरकाला अटक

डोंबिवली, ६ नोव्हेंबर / प्रतिनिधी
दोन राजकीय पक्षांच्या कलहातून एका बोगस फटाके वितरकाला अटक होण्याची विलक्षण घटना आज येथे घडली.
नुकत्याच पार पडलेल्या क.डों.म.पा. निवडणुकीत विविध वॉर्ड मधील विविध पक्षांना विजयाची खात्री होती. पैकी एका वॉर्ड मधील विजयाची खात्री असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजय साजरा करण्यासाठी भरमसाठ फटाके खरेदी केले होते. परंतु तेथे अनपेक्षित निकाल लागला व त्यांचा विरोधी पक्ष निवडून आला. त्यामुळे, 'खरेदी केलेल्या एवढ्या फटाक्यांचे काय करायचे ?' असा प्रश्न या कार्यकर्त्यांमधे निर्माण झाला होता.
'घरी जाउन मुलांना फटाके वाटा' अशी संतप्त सूचना एका निष्ठावंत कार्यकर्त्याने केली. परंतु सर्वांच्या घरची फटाके खरेदी आधीच आटोपली असल्याने, शिवाय पक्ष पराभूत झाल्यावर एवढे फटाके वाजवणे योग्य दिसत नसल्याने ही सूचना सर्वांनी फेटाळून लावली. त्याचवेळी एका उत्साही कार्यकर्त्याने 'पक्षातर्फे स्वस्त दारात फटाके विक्रीचा स्टॉल लावू' असा उपाय सुचविला. दिवाळी तोंडावर आल्याने हा तोडगा लगोलग अमलात आणला गेला.
या पराभूत पक्षाच्या स्टॉलवर आज विजयी पक्षाचे कार्यकर्ते फटाके खरेदीसाठी आले होते. त्यांनी फटाके खरेदी करताना पराभूत पक्षाच्या कार्यकर्त्यांना खिजवण्यासाठी, 'हे फटाके दिवाळीसाठी नेत नसून आमचा विजय साजरा करण्यासाठी नेत आहोत' असे सांगितले. त्यामुळे पराभूत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन स्टॉलवरील सुतळी बॉम्ब पेटवून विजयी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दिशेने फेकले. हा बॉम्ब हल्ला पाहून विजयी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तेथून पळ काढला. पराभूत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कानात बोटे घातली.
परंतु बराच वेळ झाला तरी कोणताच आवाज आला नाही असे एका (कानातली बोटे काढलेल्या) कनिष्ठ कार्यकर्त्याच्या लक्षात आले. त्याने ती बाब वरिष्ठ कार्यकर्त्याच्या निदर्शनास आणली. त्याने पाहणी केली असता सुतळी बॉम्ब फुसके निघाल्याचे त्याच्या लक्षात आले.
म्हणून खात्रीकरिता सर्व फटाक्यांची तपासणी केली असता सर्वच फटाके फुसके निघाले. या घटनेने चिडून कार्यकर्त्यांनी फटाके वितरकाच्या दुकानावर उस्फूर्त धाड घातली. त्यावेळी तो वितरक नामांकित कंपन्यांचे फटाके बोगसपणे तेथेच बनवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याची खबर पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी ताबडतोब संबंधित वितरकाला अटक केली.
परंतु एका सन्माननीय वरिष्ठ कार्यकर्त्याने या वृत्ताचा इन्कार केला आहे. "मुळात 'फटाके साठून राहीले होते म्हणून आम्ही स्टॉल लावला' हीच एक अफवा आहे. दिवाळीला स्वस्त दारात फटाके विक्रीचा स्टॉल आम्ही लावतोच. या वेळेस नागरिकांच्या तक्रारी आल्याने आम्ही वितरकाच्या दुकानावर धाड घातली. विजयी पक्षाशी कलह झाल्याची बातमी कुणीतरी खोडसाळपणे दिली असावी" अशी प्रतिक्रिया त्यांनी (स्वत:चे व पक्षाचे) नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Thursday, 14 October 2010

हुश्श...

इंजिनियरिंग करणारा बन्या सततच्या तणावामुळे वैतागला आणि त्याने सरळ आत्महत्येचा निर्णय घेतला.
तडक त्याने स्टेशन गाठलं आणि रेल्वेरुळात पडला.
दुरून ट्रेनचा आवाज आला. ट्रेन त्याच रुळावरून येत होती.
बन्या ट्रॅक मध्येच होता.
रुळ धडधडू लागले.
ट्रेन आणि बन्या मधलं अंतर कमी होऊ लागलं.
ट्रेन जवळ आली.
.
.
.
.
.
आणि इतक्यात बन्या चटकन उठून बाजूला झाला.
म्हणाला, "नाही च्यायला, उद्या सबमिशन आहे !!"
- - - -
सबमिशन म्हणजे काय असतं ते कळलंच असेल ! सगळ्या इंजिनियरिंग व इतरही कॉलेज मध्ये हा भयाण प्रकार असतो.
सबमिशन्सच्या तारखा नोटीस बोर्ड वर झळकल्या की सगळेजण खडबडून जागे होतात. सेमिस्टरच्या सुरुवातीला मिळालेले, आणि आता घरी धूळ खात पडलेले असाइनमेंट पेपर्स शोधणे सुरू होते. ते सापडल्यावर 'असाइनमेंट्स मिळवायच्या कुठून ?' हा मूलभूत प्रश्न उभा राहतो. वेळेवर असाइनमेंट पूर्ण करणार्‍या 'चतुर' (पहा: ३ ईडियट्स) विद्यार्थ्यांना मग एखाद्या सेलिब्रिटीचा दर्जा प्राप्त होतो. जो तो या मुलांना कॉलेज मध्ये शोधत असतो. या सेलिब्रिटिंकडून असाइनमेंट्स मिळवाव्या लागतात. त्या मिळवण्यासाठी अंगी कौशल्य असावे लागते. कारण आपण वर्षभर त्यांच्या काढ्लेल्या खोड्या त्यांना ज्ञात असतात. त्यामुळे 'हे सदगुरू, मी तुझ्या चरणी लीन झालो आहे. तुझ्याशिवाय माझा तारणहार कुणीच नाही' असा भाव चेहेरी ठेवून त्यांच्याशी बोलावे लागते. 'अडला हरी...' चा भाव बाळगून बोलले तर सेलिब्रिटी रागवतात व असाइनमेंट मिळत नाहीत.
असाइनमेंट मिळाल्यावर मात्र त्या पटापट पूर्ण कराव्या लागतात. प्राध्यापक चाणाक्ष असल्याने सेलिब्रिटी व आपल्या असाइनमेंट्स मधील साम्य त्यांना लक्षात येऊ शकते. त्यमुळे थोडा छापखाना व थोडे आपले डोके असे मिश्रण वापरावे लागते.
सगळे जण कागदं खरडत बसल्याची विलोभनीय दृश्य कॅंपसवर दिसू लागतात. एकवेळ खरा सेलिब्रिटी कॉलेज मधे आला तरी, "कॅटरीना ना ? मरु दे तिकडे, माझी सोळावी असाइनमेंट राहिलीये" असे उद्गार ऐकू येण्याचीही शक्यता असते.
अशी भरपूर मेहेनत घेऊन तयार केलेली फाइल सबमिशनच्या शेवटच्या तारखेला प्रोफेसरच्या डेस्क वर टेकवली म्हणजे कसं अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं !
आमच्या कॉलेज मधलं सबमिशनही नुकतंच आटोपलं आणि आम्ही सगळ्यांनी 'हुश्श' केलं...