Saturday, 6 November 2010

बोगस फटाके वितरकाला अटक

डोंबिवली, ६ नोव्हेंबर / प्रतिनिधी
दोन राजकीय पक्षांच्या कलहातून एका बोगस फटाके वितरकाला अटक होण्याची विलक्षण घटना आज येथे घडली.
नुकत्याच पार पडलेल्या क.डों.म.पा. निवडणुकीत विविध वॉर्ड मधील विविध पक्षांना विजयाची खात्री होती. पैकी एका वॉर्ड मधील विजयाची खात्री असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजय साजरा करण्यासाठी भरमसाठ फटाके खरेदी केले होते. परंतु तेथे अनपेक्षित निकाल लागला व त्यांचा विरोधी पक्ष निवडून आला. त्यामुळे, 'खरेदी केलेल्या एवढ्या फटाक्यांचे काय करायचे ?' असा प्रश्न या कार्यकर्त्यांमधे निर्माण झाला होता.
'घरी जाउन मुलांना फटाके वाटा' अशी संतप्त सूचना एका निष्ठावंत कार्यकर्त्याने केली. परंतु सर्वांच्या घरची फटाके खरेदी आधीच आटोपली असल्याने, शिवाय पक्ष पराभूत झाल्यावर एवढे फटाके वाजवणे योग्य दिसत नसल्याने ही सूचना सर्वांनी फेटाळून लावली. त्याचवेळी एका उत्साही कार्यकर्त्याने 'पक्षातर्फे स्वस्त दारात फटाके विक्रीचा स्टॉल लावू' असा उपाय सुचविला. दिवाळी तोंडावर आल्याने हा तोडगा लगोलग अमलात आणला गेला.
या पराभूत पक्षाच्या स्टॉलवर आज विजयी पक्षाचे कार्यकर्ते फटाके खरेदीसाठी आले होते. त्यांनी फटाके खरेदी करताना पराभूत पक्षाच्या कार्यकर्त्यांना खिजवण्यासाठी, 'हे फटाके दिवाळीसाठी नेत नसून आमचा विजय साजरा करण्यासाठी नेत आहोत' असे सांगितले. त्यामुळे पराभूत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन स्टॉलवरील सुतळी बॉम्ब पेटवून विजयी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दिशेने फेकले. हा बॉम्ब हल्ला पाहून विजयी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तेथून पळ काढला. पराभूत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कानात बोटे घातली.
परंतु बराच वेळ झाला तरी कोणताच आवाज आला नाही असे एका (कानातली बोटे काढलेल्या) कनिष्ठ कार्यकर्त्याच्या लक्षात आले. त्याने ती बाब वरिष्ठ कार्यकर्त्याच्या निदर्शनास आणली. त्याने पाहणी केली असता सुतळी बॉम्ब फुसके निघाल्याचे त्याच्या लक्षात आले.
म्हणून खात्रीकरिता सर्व फटाक्यांची तपासणी केली असता सर्वच फटाके फुसके निघाले. या घटनेने चिडून कार्यकर्त्यांनी फटाके वितरकाच्या दुकानावर उस्फूर्त धाड घातली. त्यावेळी तो वितरक नामांकित कंपन्यांचे फटाके बोगसपणे तेथेच बनवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याची खबर पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी ताबडतोब संबंधित वितरकाला अटक केली.
परंतु एका सन्माननीय वरिष्ठ कार्यकर्त्याने या वृत्ताचा इन्कार केला आहे. "मुळात 'फटाके साठून राहीले होते म्हणून आम्ही स्टॉल लावला' हीच एक अफवा आहे. दिवाळीला स्वस्त दारात फटाके विक्रीचा स्टॉल आम्ही लावतोच. या वेळेस नागरिकांच्या तक्रारी आल्याने आम्ही वितरकाच्या दुकानावर धाड घातली. विजयी पक्षाशी कलह झाल्याची बातमी कुणीतरी खोडसाळपणे दिली असावी" अशी प्रतिक्रिया त्यांनी (स्वत:चे व पक्षाचे) नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Thursday, 14 October 2010

हुश्श...

इंजिनियरिंग करणारा बन्या सततच्या तणावामुळे वैतागला आणि त्याने सरळ आत्महत्येचा निर्णय घेतला.
तडक त्याने स्टेशन गाठलं आणि रेल्वेरुळात पडला.
दुरून ट्रेनचा आवाज आला. ट्रेन त्याच रुळावरून येत होती.
बन्या ट्रॅक मध्येच होता.
रुळ धडधडू लागले.
ट्रेन आणि बन्या मधलं अंतर कमी होऊ लागलं.
ट्रेन जवळ आली.
.
.
.
.
.
आणि इतक्यात बन्या चटकन उठून बाजूला झाला.
म्हणाला, "नाही च्यायला, उद्या सबमिशन आहे !!"
- - - -
सबमिशन म्हणजे काय असतं ते कळलंच असेल ! सगळ्या इंजिनियरिंग व इतरही कॉलेज मध्ये हा भयाण प्रकार असतो.
सबमिशन्सच्या तारखा नोटीस बोर्ड वर झळकल्या की सगळेजण खडबडून जागे होतात. सेमिस्टरच्या सुरुवातीला मिळालेले, आणि आता घरी धूळ खात पडलेले असाइनमेंट पेपर्स शोधणे सुरू होते. ते सापडल्यावर 'असाइनमेंट्स मिळवायच्या कुठून ?' हा मूलभूत प्रश्न उभा राहतो. वेळेवर असाइनमेंट पूर्ण करणार्‍या 'चतुर' (पहा: ३ ईडियट्स) विद्यार्थ्यांना मग एखाद्या सेलिब्रिटीचा दर्जा प्राप्त होतो. जो तो या मुलांना कॉलेज मध्ये शोधत असतो. या सेलिब्रिटिंकडून असाइनमेंट्स मिळवाव्या लागतात. त्या मिळवण्यासाठी अंगी कौशल्य असावे लागते. कारण आपण वर्षभर त्यांच्या काढ्लेल्या खोड्या त्यांना ज्ञात असतात. त्यामुळे 'हे सदगुरू, मी तुझ्या चरणी लीन झालो आहे. तुझ्याशिवाय माझा तारणहार कुणीच नाही' असा भाव चेहेरी ठेवून त्यांच्याशी बोलावे लागते. 'अडला हरी...' चा भाव बाळगून बोलले तर सेलिब्रिटी रागवतात व असाइनमेंट मिळत नाहीत.
असाइनमेंट मिळाल्यावर मात्र त्या पटापट पूर्ण कराव्या लागतात. प्राध्यापक चाणाक्ष असल्याने सेलिब्रिटी व आपल्या असाइनमेंट्स मधील साम्य त्यांना लक्षात येऊ शकते. त्यमुळे थोडा छापखाना व थोडे आपले डोके असे मिश्रण वापरावे लागते.
सगळे जण कागदं खरडत बसल्याची विलोभनीय दृश्य कॅंपसवर दिसू लागतात. एकवेळ खरा सेलिब्रिटी कॉलेज मधे आला तरी, "कॅटरीना ना ? मरु दे तिकडे, माझी सोळावी असाइनमेंट राहिलीये" असे उद्गार ऐकू येण्याचीही शक्यता असते.
अशी भरपूर मेहेनत घेऊन तयार केलेली फाइल सबमिशनच्या शेवटच्या तारखेला प्रोफेसरच्या डेस्क वर टेकवली म्हणजे कसं अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं !
आमच्या कॉलेज मधलं सबमिशनही नुकतंच आटोपलं आणि आम्ही सगळ्यांनी 'हुश्श' केलं...

Tuesday, 13 July 2010

कोणे एके काळी...

राजवाड्यावर उत्साहाचे वातावरण होते. पक्वान्नांची तबकं घेऊन दासी लगबगीने विहार करत होत्या. सर्व लोकांच्या मुखावर आनंद ओसंडून वाहत होता. कारण राज्याला राजपुत्र लाभला होता. राजा राणी आणि सर्व जनता आनंदी झाली होती. राजपुत्रास पाहण्यासाठी व आशीर्वाद देण्यासाठी देशोदेशीचे राजे, ऋषि उपस्थित होते, त्याच्यासाठी सदिच्छा देत होते.
राजपुत्राची मंगलमयी पत्रिका रेखाटण्यासाठी राज-ज्योतीषास पाचारण करण्यात आले. अचूक भविष्य सांगण्याबद्दल त्याची ख्याती होती.
राज-ज्योतिषाने राजपुत्र बाळाच्या निढळावर हात ठेवला आणि डोळे मिटले.
सर्व जण भावी नरेशाचे उज्ज्वल भविष्य ऐकण्यासाठी उत्सुकतेने पुढे झाले.
"राजन्, क्षमा असावी" ज्योतिषाने राजास म्हटले. राजाच्या हृदयाचे ठोके जलद पडू लागले.
"काय झालं ?" तो चिंताग्रस्त चेहर-याने विचारता झाला.
"राजपुत्राचे दोन्ही पाय निकामी होणार आहेत !"ज्योतिषाकडून उत्तर मिळाले. कानात धातूचा तप्त रस ओतल्यासारखे ज्योतिषाचे ते शब्द राजाच्या कानी पडले. मुखावरचा आनंद क्षणात मावळला. तेथे उपस्थित सर्व नरेशांची तीच अवस्था झाली. सर्वांनी हळहळ प्रकट केली.
तेथेच असलेल्या राज-ऋषींच्या चेह-यावर मात्र क्रोध प्रकटला. राजाविषयी त्यांना जिव्हाळा होता. म्हणून राजपुत्राबद्दल ज्योतिषाने उद्गारलेले ते शब्द त्यांना रुचले नाहीत. त्यांच्या डोळ्यांत अग्नी पेटला अन् त्या अग्नीहूनही तप्त अशी शापवाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडली,
"राजाच्या मुखावर दुख: आणणा-या ज्योतिषा, राजपुत्राबद्दल अभद्र बोलून तू माणुसकीला काळिमा फासला आहेस...म्हणून तुला पुढील जन्मी माणूस म्हणून न जगता एक य:कश्चित प्राणी म्हणून जीवन व्यतित करावे लागेल !! राजपुत्राच्या पायांविषयी अभद्र बोलणार्‍या चान्डाळा, तुला पुढील जन्मी आठ पाय असतील !!! "
ती भयानक शापवाणी ऐकून ज्योतिषाला भय वाटू लागले. तो गयावाया करत म्हणाला,
"मुनिवर्य, मला माफ करा. भविष्यात जे काही आहे तेच मला सांगावे लागते म्हणून माझ्या मुखातून असे अभद्र बाहेर पडले. मी कधीच राजाचे अथवा राजपुत्राचे वाईट चिंतिले नाही. मला क्षमा करा...कृपया शाप मागे घ्या"
ऋषिंचा क्रोध एव्हाना मवळला होता. रागच्या भरात आपण भलतेच बोलून गेलो हे त्यांना समजले. ते म्हणाले,
"ज्योतिषा, क्रोधाच्या आहारी जाउन मी तुला शाप दिला. पण आता तो मागे घेणे अशक्य आहे. मी तुला उ:शाप देतो... ज्योतिषा, पुढील जन्मी जेव्हा तू आठ पायांचा प्राणी म्हणून जन्माला येशील तेव्हा तुझपाशी असलेली भविष्य सांगण्याची अचूक क्षमता कायम राहील. समस्त जनता तुझा उदो उदो करील. एखादा पराक्रम करणार्‍या व्यक्तीपेक्षा तो पराक्रम सांगणार्‍या तुझा जयघोष होईल !! तथास्तु "

[अतिशय महत्वाची सूचना : हा प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहे. वास्तवात असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी अथवा प्राण्याशी त्याचा संबंध जोडण्याचा फुका प्रयत्‍न करू नका !!]

Sunday, 27 June 2010

माझी कथा लोकसत्तात !

पोस्ट खरं तर 'हास्यब्लॉग' वर लिहिण्यासारखी नाही...म्हणजे विनोदी वगैरे नाही ('नेहमी लिहितोस ते काय फार विनोदी वाटतं काय ?' असं मनात म्हणलात ते कळलं बरं का ! ) . पण माझ्याकडे दुसरा दैनंदिनी-ब्लॉग नाही म्हणून इथे लिहीत आहे.

माझी 'भेट!'.ही धक्कांतिका आजच्या लोकसत्तात प्रकाशित झाली. लोकरंग पुरवणित 'गोष्ट' या सदरात.

ही कथा मी पाच मार्च ला पाठवली होती. नंतर अनेक रविवार वाट बघितली पण 'भेट' झालीच नाही. मला वाटलं एक तर ती पोहोचली नसेल नाहीतर त्यांना आवडली नसेल. आणि त्यांनी कथा स्वीकारली का नाही हे कळायला पण मार्ग नव्हता. कारण मी माझा जुना horizondesai@gmail.com' हा आयडी दिला होता. तो आता बंद आहे. (ते सुद्धा फाजील पणामुळे. त्या आयडिवर माझं दुसरं गूगल अकाउंट मर्ज करण्यासाठी आधी तो डिलीट केला. आणि नंतर त्याच नावाने साइन अप करताना कळलं की गूगल ईमेल आयडी रिसायकल करत नाही ! :( )

तर ती कथा आज प्रकाशित झाली. त्याला साजेसं सुंदर चित्रही छापलं आहे.Tuesday, 15 June 2010

भवानी तलवार

'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा चित्रपट नक्कीच सगळ्यांनी पहिला असेल. मस्त पिक्चर आहे, मला आवडला.
पण त्यातला एक प्रसंग पाहताना मात्र (प्रसंग विनोदी नसतानाही) हसणं आवरता आलं नाही.

तर तो प्रसंग असा आहे:
दिनकर भोसले हा कथानायक, 'गोसालिया' या दुष्ट पात्रावर तलवार उगारून उभा असतो. आपल्याला वाटतं आता तलवारीचा वार होणार. पण दिनकर भोसले म्हणतो,

"महाराजांनी दिलेल्या तलवारीनं तुझ्यासारख्या भेकड आणि नीच माणसाचा खून करणार नाहीए मी"

फोटो सौजन्य : यु ट्यूब (आणि कीबोर्ड वरचे 'प्रिंट स्क्रीन' बटन)

म्हणजे ?? नीच माणसावर तलवार चालवायची नाही तर काय सज्जनांना कापून काढायचं ? !!

शिवाजी महराजांनी ज्या मोगल नि इतर लोकांना वर (इथे मी 'खाली' लिहिणार होतो, पण ज्याला युद्धात मरण येतं तो स्वर्गात जातो असं ऐकलय) पाठवलं ती लोकं नीचच होते की नाही. मग...

Monday, 17 May 2010

अचाट मोदीसॉलिड बातमी होती आज सगळ्या पेपरांत. BCCI च्या 'कारणे दाखवा' नोटीसला मोदी यांनी बारा हजार पानी उत्तर दिले. खरंच अचाट ईसम आहे हा मोदी ! ३५ पानांच्या नोटीसला एवढं मोठं उत्तर ? इकडे मराठीच्या तासाला संदर्भासाहित स्पष्टीकरणाला १०-१२ ओळी लिहिताना आमची बोंबाबोंब व्हायची अन् हे बेणं पाठवतंय खोकिच्या खोकी भरून उत्तर !

आता केकता कपूर--सॉरी--एकता कपूरला नवीन सीरियल सुरू करण्याची नामी संधी आहे. 'कहानी क्रिकेट किंग की' (यातल्या क्रिकेटचं स्पेलिंग 'Kricket' बरं का) या नावाने सीरियल जाहीर करायची आणि त्यात ललित मोदींची 'छोटिशी' मुलाखत घ्यायची. १२००० हजार पानी उत्तरं देण्याची सवय असणार्‍या मोदींची ती मुलाखत रोज डेली सोपच्या धर्तीवर दाखवल्यास किती दिवस सुरू राहील याचा हिशोब करा !

बाकी ते उत्तर खरंच एवढं मोठं नसणार. मजकुराची लांबी वाढवायची ती जुनीच आयडिया आहे. त्यात लिहिलं असेल, "आम्ही बॉल खरेदी केले. त्याची क्वालिटी तपासण्यासाठी त्याचे टप्पे पाडून पाहिले. टप्पे असे पडले--टप टप टप टप....टप टप टप टप.....टप टप टप टप.....टप टप टप टप.....एन्"

बरोबर ना ?

Saturday, 15 May 2010

फाजिती

हा ब्लॉग सुरू केला तेव्हा उत्साहाने ब्लॉगवर साइट काउंटर टाकले होते. अर्थात फ्री काउंटर असल्याने त्या काउंटर देणार्‍या साईट ची लिंक त्याला होती. पण तेव्हा असलेल्या HTML च्या थोड्याफार माहितीवरून त्या कोड मधे काडी करून ती लिंक मी काढून टाकली. म्हटलं कोणाच्या तातश्रींना कळतंय ?

मग प्रत्येक पोस्ट नंतर काउंटर वर वाढत जाणार्‍या संख्येकडे पाहायला अभिमान वाटायचा. आपलं लिखाण (खूपच पांचट असूनही) कोणीतरी वाचतय ही गोष्ट मनाला सुखवायची. त्या काउंटर चा 'अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा' होताना पाहायची उत्सुकता होती.

आणि एके दिवशी घात झाला. फ्री काउंटरवाल्यांना कसे कोण जाणे माझी लबाडी समजली. त्या दुर्दैवी सकाळी ब्लॉग पहिला तर काउंटर दिसेना. त्या जागी Account Suspended. No Link Found असा रूक्ष मेसेज !

मग आज परत काउंटर लावायचा ठरवलाय. ब्लॉग वर अतपर्यंतच्या नोंदी आहेत १७ (अरेरे! एवढ्याच ?). म्हणजे एका नोंदीला किमान तीस जणांनी भेटी दिल्या असं म्हटलं तर संख्या होते सतरा त्रिक चोपन्न-नव्हे-एक्कावन वर एक शून्य = ५१०. आणि आधीच्या काउंटर ने ५०० चा आकडा क्रॉस केलेला नक्की आठवतोय. सो आता हा काउंटर ५१० पासूनच सुरू करतो.

Thursday, 13 May 2010

बावळट प्रश्न आणि हुशार उत्तर !

हा टॉपिक आधी उल्लेखलेल्या 'मराठी विनोद कम्युनिटी' मधलाच. 'प्रशांत' यांनी हा टॉपिक सुरू केला आहे
अनेकदा लोकं असे प्रश्न विचारतात जे अतिशय मुर्खपणाचे असतात... अशा प्रश्नांना दिलेली ही हटके उत्तर आहेत.
पहा काही नमुने :

हॉटेल मध्ये अनेक जण वेटर ला 'इथे जेवण कसं मिळतं' हे विचारतात.... आता तो काय वाईट मिळत म्हणून सांगणार ? तरी असलाच एखादा इरसाल वेटर तर.....

गिर्हाईक: इथे पनीर मसाला चांगला मिळतो का हो ?
वेटर: छे !! बांधकामावरच सिमेंट आणुन कालवतो ते आम्ही त्यात...कसला चांगला लागतोय

या टॉपिक मधे रश्मिन यांनी मस्त नमुने दिले आहेत:

प्रश्न- अरे वा! घरीच आहात वाटतं?
उत्तर- नाही माझ्या पश्चात ही इमारत "राष्ट्रिय वास्तु" घोषित झाली तर कसे वाटेल हे बघायला आलोय

सकाळी.
प्रश्न - पेपर वाचताय वाटतं!
उत्तर- नाही! ओल्या शाईचा (इंक) वास घेतल्या शिवाय मला ताजेतवाने वाटत नाही.

सिनेमागृहा बाहेर
प्रश्न: काय पिक्चर बघायला आलात वाटतं?
उत्तर: छे! फावल्या वेळात तिकिटे "ब्लैक" करून अर्थार्जन करावं म्हणतोय! पण! इथेही तुम्ही आमच्या "आधी" हजर!!

सकाळी फिरायला निघाला आहात
प्रश्न: काय "मोर्निंग वाक्" वाटतं??!!!
उत्तर: काही तरी काय! नगरपालिकेचं कंत्राट घेतलय मैलाचे दगड कुणी पहाटे चोरून तर नेत नाही ना याची खात्री करतोय!!

प्रश्न- प्रवासाला निघालात वाटतं? (हातात लगेज बघून !!!!)
उत्तर- नाही हल्ली व्यायाम करायला सवड मिळत नाही ना! शिवाय जिम चे पैसे ही वाचतात !!

Wednesday, 5 May 2010

Orkut वरील 'मराठी विनोद' कम्युनिटी

सध्या orkut वर लॉग इन झाल्यावर मी सगळ्यात पहिल्यांदा भेट देतो ते 'मराठी विनोद' या कम्युनिटीला. त्याशिवाय पुढचं orkut सर्फिंग चांगलं जात नाही. ह्या कम्युनिटिचं सभासदत्व मी खूपच आधी घेतलं होतं. तेव्हा फक्त एक दोन वेळा भेट दिली असेन. पण ही कम्युनिटी माझ्या orkut सर्फिंग चा कायमचा भाग झाली ते या एप्रिल पासून.
त्याचं झालं असं की आमची सेमिस्टर परीक्षा तोंडावर आली होती. 'सी प्रोग्रामिंग' (एक भयंकर विषय) ची थियरी वाचून वाचून वैताग आला होता. म्हणून orkut लॉग इन झालो. मग सहज लक्ष गेलं आणि 'मराठी विनोद' ला भेट दिली.
तिथले मस्त जोक्स, गेम्स, वाचून डोकं एकदम फ्रेश झालं. आता रोजच्या रोज तिथे भेट दिल्याशिवाय राहवत नाही. या कम्युनिटी ला भेट दिल्यावर तुम्ही पण जाम खूष व्हाल.
Ram Indulkar यांनी सुरू केलेली ही कम्युनिटी http://www.orkut.co.in/Main#Communitycmm=21132317 या पत्त्यावर आहे.
इथे सगळेच टॉपिक मस्त आहेत. धम्माल ''मजेशीर'' ई- मेल आय-डी सुचवा , चला भांडुया, Phone Call, वरील व्यक्तीच्या Profile मधीलBestगोष्ट, हे आणि असे अनेक गेम्स खेळूनच नव्हे....तर नुसते वाचूनही मजा येते. आणि वेगवेगळे जोक्स चे फोरम तर मस्तच आहेत. सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका, बावळट प्रश्न आणि हुशार उत्तर, मजेदार मोबाइल संदेश, राम इंडुलकरांचे जोक्सचे फोरम्स, उखाणा, --- नावं देता देता मोठी लिस्ट होईल.
मराठी विनोद चे नेहमीचे सभासदही आता खूप वर्षांपासूनची ओळख असल्यासारखे वाटू लागले आहेत. तुम्ही पण एकदा भेट देऊन पहा. मूड फ्रेश व्हायला मदत होईल.

Monday, 3 May 2010

उड जावे चिडिया भुर्रर...

नशेत बिल्डिंग वरुन पडल्यामुळे तळीरामला हॉस्पिटल मधे अड्मिट केले होते. त्याचा मित्र दुसर्‍या दिवशी भेटायला आला.

"अरे काल काय झाल रे ? मला काहीच आठवत नाही" तळीराम म्हणाला.

त्याचा मित्र सांगू लागला,

"अरे, काल आपण सगळे त्या पक्याच्या घरी टेरेस वर पीत बसलो नव्हतो का... तेव्हा तू म्हणालास आता मी चिमणीसारखा भुर्रर उडून जातो...आणि उडी मारलीस..."

"मूर्खा, मग मला थांबवायच होतस ना !" तळीराम डाफरला.

"पण मला तेव्हा वाटलं तू सहज उडत जाशील म्हणून..."

Sunday, 2 May 2010

चायनीज ??

स्थळ : मुंबईतला तसा कमी गर्दीचा बसस्टॉप.
वेळ : अशीच.....निवांत.
पात्रे : दोन मनुष्य.
मनुष्य क्रमांक एक : तुम्ही चायनीज आहात का हो ?
मनुष्य क्रमांक दोन : नाही. इथलाच आहे मी.

(थोड्या वेळाने)

मनुष्य क्रमांक एक : सांगा ना तुम्ही चायनीज आहात का ?
मनुष्य क्रमांक दोन : (त्रासून) सांगितल ना एकदा...नाही.

(परत थोड्या वेळाने)

म.क्र. एक : सांगा ना तुम्ही चायनीज आहात का ?
म.क्र. दोन : (रागावून) अहो काय हे.......नाहीए मी चायनीज किती वेळा सांगू ??

(परत अजुन थोड्या वेळाने)

म.क्र. एक : खरं सांगा.....चायनीज आहात ना ?
म.क्र. दोन : (किंचाळून) हो....आहे मी चायनीज. बोला....
म.क्र. एक : काहीतरीच सांगताय.....चायनीज म्हणे.....चेहे-यावरून अजिबात वाटत नाही !!

Monday, 25 January 2010

हॅपी प्रजासत्ताक दिन"बाळा, उठ, सहा वाजले"
"नको ना आई. झोपू दे. नाहीतरी आज स्वातंत्र्य दिन आहे. मला स्वातंत्र्य दे झोपण्याचं"
"अरे गाढवा, स्वातंत्र्य नाही, प्रजासत्ताक दिन आहे"
"तेच ते......झोपू दे मला"
"झोपू दे काय ? मग शाळेत कोण जाणार झेंडवंदनाला ?"
"मी नाही जाणार, मला कंटाळा येतो"
"अरे, कंटाळा कसला त्यात ?"
"हो....मला सगळी मुलं चिडवतात"
"अरे, मुलंच आहेत ती...चिडवणारच"
"नाही, मी नाही जाणार !"
"जाणार नाही काय ? किती विचित्र दिसेल ते ?"
"काही विचित्र वाटत नाही हां"
" नाहीतर काय.....झेंडवंदनाला मुख्याध्यापक गैरहजर आहेत दिसल्यावर गोंधळ नाही का होणार !!!"


सर्व वाचकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !!! जय हिंद !!

Tuesday, 19 January 2010

प्रेम त्रिकोण

ते दोघे लहानपणापासून चे मित्र होते. 'ते' म्हणजे राजू आणि विजू. एकत्र अभ्यास केला......एकत्र नापास झाले.....आपापल्या घरी एकाच वेळी ओरडा खाल्ला....मग एकत्र मन लावून अभ्यास केला.....एकत्र पास झाले. दोघांना अभ्यासाची गोडी लागली. दोघांना चांगले मार्क्स पडू लागले. ही मुले दहावीत नाव काढणार असं सगळे म्हणू लागले. आणि तसच झालं दोघांनाही चांगले टक्के पडले. साहजिकच शास्त्र शाखेकडे दोघे वळले. इथपासून दोघांचे मार्ग भिन्न होवू लागले. राजू ला आवड होती गणिताची....तर विजू जीवशास्त्रात रमे.

त्यामुळे राजू ने बारावीनंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला तर विजू ने वैद्यकिय महाविद्यालयात. तरीही मैत्री काही तोडली नाही. यथावकाश त्यांनी आपापले अभ्यासक्रम पूर्ण केले.

दरम्यान त्यांच्या परिसरात एक तरुणी राहायला आली. लहान पणापासून सगळ्या गोष्टींचा एकत्र अनुभव घेतलेल्या राजू आणि विजू ला तिच्या प्रेमात पडायला वेळ लागला नाही. दोघांनाही तीच तरुणी आवडायची. दोघांनी तिच्याशी मैत्री केली. आता मात्र ते दोघे मित्र राहीले नाहीत. नेहमी एकीमेकांवर मात कशी करता येईल हे ते बघत.एकदा काही कामानिमित्त राजू ला आठवडाभर बाहेर जायचे होते. तर त्याने त्या तरुणीला चक्क सात सफरचंद दिले आणि गेला.


वाचक हो, कोणी कल्पना करू शकेल असं अचाट गिफ्ट त्याने का दिलं असावं ?

अहो, विजू ला तिच्यापासून दूर ठेवण्यासाठी ! AN APPLE A DAY, KEEPS DOCTOR AWAY !!!