Wednesday 16 April 2014

आम्ही मोदी, जीना आणणार आहे !

एक जाहिरात पहिली टीव्हीवर. मराठी चॅनेल सुरू होता. मी होतो दुसर्‍या खोलीत.
जाहिरातीत गाणं वाजायला लागलं, "आम्ही मोदी, जीना आणणार आहे"
मी अवाक् !


मोदी-जीना ? ही जोडी कशी बरं जमवली ?
मोदी-पटेल एक वेळ पटेल.
मोदी-गांधी सुद्धा चालू शकेल.
अगदी मोदी-नेहरू सुद्धा चालवून घेता येईल. (दि फर्श्ट पीएम अँड दि नेक्श्ट पीएम)
पण मोदी-जीना ?

दुसर्‍या दिवशी तीच जाहिरात हिंदी चॅनेलवर पहिली,  "हम मोदीजी को लानेवाले है"
तेव्हा कोडं उलगडलं. 'मोदीजी' आहे तर !
#lame puns

Sunday 6 April 2014

आहारतज्ञ ऋजुता दिवेकर निवडणूक प्रचारात ? - खोडसाळ टाईम्स

खो.टा. प्रतिनिधी, मुंबई
निवडणूक प्रचारात सिनेकलावंतांना पाहण्याची सवय मतदारांना झालेली आहे. मात्र काही पक्ष प्रचारासाठी हटके आयडिया लढवत आहेत.
'तेलकट वडे - चिकन सूप' च्या आरोपांनी व्यथित झालेल्या सेना नेतृत्वाने या आरोपांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी डाएट एक्स्पर्ट ऋजुता दिवेकर यांना पाचारण केल्याची चर्चा आहे. 'आम्ही फुकाचे आरोप करत नाही. म्हणून या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तीला आमंत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे' असा दावा कार्यकर्त्यांनी खासगीत केला.
मात्र सेनेवर मात करण्यासाठी कॉंग्रेसने देखील ऋजुता दिवेकर यांना प्रचारार्थ बोलावले असल्याचे समजते. 'विरोधी पक्ष आज अन्नाचा मुद्दा काढत असले तरी मुळात अन्नसुरक्षा कायदा आम्ही आणला.' असे प्रतिपादन कॉंग्रेस नेत्यांनी केले. अन्नसुरक्षा कायदा व महिला सबलीकरण हे मुद्दे कॉंग्रेससाठी निवडणुकीत महत्वाचे आहेत. ऋजुता दिवेकर आहारतज्ञ आहेत, तसेच त्या स्वत: स्वतंत्र सक्षम महिला आहेत त्यामुळे कॉंग्रेससाठी त्यांचा चेहरा योग्य ठरेल, असा विश्वास कॉंग्रेस धुरिणींना वाटत आहे.
त्याच दरम्यान 'आप'नेही त्यांनाच प्रचारात बोलावण्याचा प्रयत्न चालू केला असल्याचे वृत्त आहे. 'उन्हाळा हा आंब्यांचा सीझन. चांगल्या आरोग्यासाठी सीझननुसार फळे खावीत, असे ऋजुता दिवेकर म्हणतात. आमच्या पक्षाच्या नावातच 'आम' आसल्याने त्यांनी आमच्या पक्षाच्या प्रचाराला यावे अशी विनंती आम्ही करणार आहोत.' असे एका आम आदमीने सांगितले.
या संबंधात खो.टा. प्रतिनीधींनी वारंवार प्रयत्न करूनही दिवेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Saturday 5 April 2014

मी पाठ आहे

शीर्षक बघून गोंधळण्याचं काही कारण नाही. 'I am back' चं संदर्भहीन भाषांतर आहे हे. सध्या बरीच संदर्भहीन राजकीय भाषणे आणि टीका-टिपण्णी ऐकावी लागत असल्यामुळे तसंच भाषांतर केलं.
तर सांगायचा मुद्दा हा, की मी ब्लॉगवर परतलोय ! साधारण दोन वर्षांनी. तसंही लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारांची आठवण पाच वर्षांनी होते, त्या तुलनेत मला फार लवकर आठवण आली ब्लॉगची :D
तसं आठवण यायचीच सारखी, पण आज लिहू - नंतर लिहू म्हणून राहून जायचं.
एखाद्या 'ट्रिगर' ची गरज होती ;)  आणि मागच्याच महिन्यात 'ट्रिगर' ओढला गेला.
आमच्या शहरातल्या थेटरात 'फॅंड्री' पाहायला गेलो होतो. रात्रीचा खेळ. शो संपल्यावर जिना उतरून बाहेर येताना पाठीवर थाप पडली. वळून पाहिलं तर, 'वटवट सत्यवान' ब्लॉगच्या वॉलपेपर वरचा चेहरा समोर ! समोर खरोखरीच हेरंब दादा उभा होता. सातासमुद्रा पलिकडून थेट 'टिळक' टॉकिजात.
(दादा देखील डोंबिवलीत पाठ आहे.)
त्याचाशी बोलताना जाणवलं की कित्ती दिवस झाले ब्लॉगवर काही लिहिलंच नाही आपण !
सो फायनली आज, ब्लॉगवर मी पाठ आहे.