Sunday 14 October 2012

ती येतेच !


कितीही वेळा मनाशी ठरवलं की तिला नकार द्यायचा, या वेळेस तरी 'नाही' म्हणायचं, तरी प्रत्यक्षात तसं म्हणता येत नाही. ती येतेच. येते आणि वाहवत नेते मला तिच्यासोबत.
किती नुकसान करून घेतलं आहे तिच्यामुळे  मी स्वत:चं !
आईला सुद्धा माहीत आहे तिच्या बद्दल सगळं. ती म्हणते , 'तुला अभ्यास आहे एवढा, बाकीची कामं आहेत.. तरी सगळं सोडून पुन्हा तिच्या नादी का लागतोस तू ?'
मला पण पटतं हे. मनाशी ठरवतो, बस झालं ! आता  यापुढे ठामपणे नकार द्यायचा तिला. पण ती येतेच. नेहमी प्रमाणे येते आणि अशी काही जादू करते की नकार विरघळून जातो तिच्यात.
काय आहे, मनाशी कितीही वेळा ठरवलं ना, तरी शरीर प्रत्येक वेळेस होकार देतं. मनाचे बंध झुगारून शरीर तिच्याकडे धाव घेतं. म्हणूनच ती येते.
आजही ती आली होती..
ती म्हणजे 'रविवार दुपारची झोप' :D :D :D
म्हटलेलं रविवार आहे तर सगळ्या असाइनमेंट्स लिहून काढूया, पण कसलं काय ! जेवण झाल्यावर जी ताणून दिली दुपारी, की पाच वाजता उठलो.
त्यातल्या त्यात एक बरं झालं, 'तिच्या' निमित्ताने ब्लॉग वरची धूळ झटकून नवीन पोस्ट तर आली :)

Friday 1 June 2012

'देशव्यापी' भारत बंद

नाही, शीर्षक चुकून दिलेलं नाही. हे खरं आहे. एका पक्षाच्या बोर्डावर 'देशव्यापी भारत बंद' असं लिहिलेलं पाहिलं. म्हणजे इतर वेळचा भारत बंद कसा असतो ? हे म्हणजे 'अख्खा मुंबई में वर्ल्डफेमस' सारखं झालं. पण बरीच लोकं बोलताना असे भलते शब्द प्रयोग वापरत असतात. एक प्रसिद्ध शब्द प्रयोग म्हणजे 'बॅडलक खराब आहे यार !'
"एका सेकंदासाठी गाडी गेली रे ! माझं बॅडलकच खराब आहे" असं एक मित्र म्हणत होता. आता 'बॅडलक' खराब असेल तर त्याचं लक चांगलं आहे असाच अर्थ झाला ना ?
तसं लहान मुलांच्या लेखी वाढदिवस कायम हॅपी असतो.
"अरे वा ! चॉकलेट कशाबद्दल ?"
"आज माझा हॅपी बड्डे आहे ना, म्हणून" असं ते सहज म्हणून जातात.
बरोबर आहे, मोठी माणसं वाढदिवस वेन्जॉय करायचं सोडून नसत्या विचारात गुंतलेली असतात. (आपली शिरिन बघा, वाढदिवसाला म्हणते "आपण एक वर्ष मोठे झालो याचा आनंद साजरा करायचा की आयुष्यातलं एक वर्ष कमी झालं म्हणून दु:ख करायचं ?"  )
वाढदिवसावरनंच आठवलं, भारत बंद वाल्या एका बोर्डावर लिहिलं होतं 'पेट्रोल वाढीच्या निषेधार्थ भारत बंद !'
पेट्रोल वाढलं तर वाढू द्या की, फक्त त्याचे दर कमी करा ! तसंही, पेट्रोल वाढलं तर दर कमी होतील का ? सप्लाय अँड डिमांड असं काहीतरी ऐकल्यासारखं वाटतंय. तज्ञानी कृपया मार्गदर्शन करावे :)

Monday 16 January 2012

जादू


फेसबुकवर दोन प्रख्यात व्यक्तींचा एकत्र फोटो मिळाला.
मग काय, फोटोशॉप मध्ये थोडी मजा केली !