Saturday 22 November 2008

पर्यटन

वा ! आता कुठे ब्लॉग लिहायला वेळ मिळाला. मी जरा बिझी होतो. आमच्या कडे एक चिनी पाहुणा आलेला. थोड्या गप्पा(मोडक्या इंग्रजीतून) झाल्यावर तो म्हणाला की त्याला भारतातली प्रसिद्ध ठिकाणं पाहायची आहेत. मी त्याला पहिले ' इंडिया गेट' दाखवलं. त्याला ते आवडलं.
म्हणाला, "हे बनवायला किती दिवस लागले असतील ?"
मी उत्तर दिलं-,"अरे दिवस नाही, काही वर्ष लागली असतील."
"वर्ष ? आमच्याकडे तर दोन-तीन आठवड्यात असा दरवाजा बनवतील"
चीन मधली भिंत अठवून मी त्याला काही बोललो नाही. पण दुसर्‍या दिवशी त्याला डायरेक्ट ताज महाल दाखवायला नेलं. तेव्हा पण तोच प्रश्न-
"हे बनवायला किती महिने लागले ?"
आमचं इतिहासाचं जुनं पुस्तक आठवून (आणि त्यातली काही वर्ष गाळून) मी म्हणालो,
"काही तरी दहा-पंधरा वर्ष लागली"
"दहा वर्ष ? आमच्याकडे तर हे दहा महिन्यात बनवतील"
माझं देशप्रेम उफाळून आलं. मी त्याला पुढच्या दिवशी कुतुब मिनारला घेऊन गेलो. तो त्याला खूप आवडलेला दिसत होता.
"हे मात्र चांगलं बनवलय. तू मला ते इंडिया गेट नि ताज महाल वगैरे दाखवण्यापेक्षा हा कुतुब मिनार आधीच का नाही दाखवलास ?"
"कसा दाखवणार ? कालपर्यंत हा बनलेला थोडीच !!!"


(काल्पनिक)

Saturday 8 November 2008

शोले.....

बन्या (नेहमीसारखाच) धावत आला.
"अरे तू शोले बघितला आहेस का ?"
हे विचारणे म्हणजे माणसाचा घोर अपमान आहे. शोले पहिला नाही म्हणजे काय ?
"होय" मी शब्दावर जोर देत म्हणालो.
"मग मला सांग त्यात डबल रोल कुणाचा आहे ?"
"तू स्वत: बघितला आहेस का शोले - अरे शोलेत डबल रोल नाहीये"
"अरे आहे रे.."
" तू नवीन आग बद्दल बोलतोय का?"
"नाही, ओरिजिनल शोले मध्येच"
"नाही येत-- आय मिन त्यात कोणाचा डबल रोल नाहीचए" मी हताश होत म्हणालो.
"अरे शेवटच्या सीन मध्ये बघ. अमिताभ धर्मेंद्रला ते खोट नाणं दाखवतो. त्या नाण्यावर 'किंग जॉर्ज चा डबल रोल आहे !!!"

Sunday 2 November 2008

सवय

"अहो डॉक्टर, आमचा बन्या पहा" बन्याची आई डॉक्टरांना सांगत होती.
"काय झालाय त्याला ?"- डॉक्टर.
"अहो तो सारखा टीव्ही समोर बसून असतो"
"बरोबर आहे. त्याच्या वयाच्या मुलांना टीव्हीचं आकर्षण असतच."
"ते मलाही माहितीये"
"मग प्रॉब्लेम काय आहे ?"
"अहो तो बंद टीव्ही समोर बसलेला असतो !!! "

Friday 24 October 2008

आयर्लंड चे बुद्धिवन्त

आयर्लंड च्या ए लेवेल ची प्रश्‍नपत्रिका मला ईमेल वरुन मिळाली होती. ती सोडवण्याचा प्रयत्न करा. मग खूप वेळ गेला तर उत्तरे पाहून समाधान करा.


Sunday 19 October 2008

गंमत

सचिनचा विक्रम पाहिलात का ? कालचा दिवस चांगला असावा. आमची सत्र परीक्षा कालच संपली. परीक्षेला धमाल आली. तुम्हाला एक प्रसंग सांगतो.
नेहमी प्रमाणे पेपर चालू होता. सगळे पटापट लिहीत होते.आणि बन्या एकदम गरर्कन पाठी फिरला. आणि पाठच्याचा पेपर पाहू लागला. पर्यावेक्षकांच्या चाणाक्ष नजरेतून ही गोष्ट टिपली गेली. त्यांनी लगेच विचारलं,
"पाठी काय पाहतो आहेस रे?" बन्या सरळ म्हणाला,
"सर, प्रश्नपत्रिकेतच असं लिहिलयं"
सरांना हे आवडल नसावं. त्यांनी बन्याला प्रश्नपत्रिका घेऊन पुढे बोलावलं. बन्याने सरांना सूचना दाखवली.
तिकडे लिहिलेलं-'कृपया मागे पहा'
आत्ताच आम्हाला समजलय पेपर सेटर्सना सूचना देऊन ठेवलीये प्रश्नपत्रिकेत स्पष्टपणे 'कृपया मागील पानावर पहा' असं छापा.

Sunday 12 October 2008

हास्यारंभ...

"आहेत चिंता आयुष्यात फार,
म्हणून कंटाळून जाउ नका,
हलका कराया भार थोडा,
हास्यारंभ करू चला !"

ही वाक्ये कोणाची आहेत हे आठवण्यासाठी बुद्धीला ताण देऊ नका. ही वाक्ये माझीच आहेत. पण अवतारणात आणि तिरके वगैरे केल्या शिवाय ही कविता (?) तुम्ही वाचली नसती.
या हास्यब्लॉग वर आपले स्वागत आहे. या ब्लॉगवर असतील विनोद, लेख, व्यंग चित्रे, विडंबन किंवा विनोदी पुस्तकांचा परिचय किंवा असच काही. मात्र जे काही असेल ते हास्यंबंधित (हास्य + संबंधित) असेल. तुम्ही या हास्यब्लॉग वर ई-हसू शकता.
तर तुमचा फार वेळ घेत नाही. लवकरच भेटू...