Tuesday 13 July 2010

कोणे एके काळी...

राजवाड्यावर उत्साहाचे वातावरण होते. पक्वान्नांची तबकं घेऊन दासी लगबगीने विहार करत होत्या. सर्व लोकांच्या मुखावर आनंद ओसंडून वाहत होता. कारण राज्याला राजपुत्र लाभला होता. राजा राणी आणि सर्व जनता आनंदी झाली होती. राजपुत्रास पाहण्यासाठी व आशीर्वाद देण्यासाठी देशोदेशीचे राजे, ऋषि उपस्थित होते, त्याच्यासाठी सदिच्छा देत होते.
राजपुत्राची मंगलमयी पत्रिका रेखाटण्यासाठी राज-ज्योतीषास पाचारण करण्यात आले. अचूक भविष्य सांगण्याबद्दल त्याची ख्याती होती.
राज-ज्योतिषाने राजपुत्र बाळाच्या निढळावर हात ठेवला आणि डोळे मिटले.
सर्व जण भावी नरेशाचे उज्ज्वल भविष्य ऐकण्यासाठी उत्सुकतेने पुढे झाले.
"राजन्, क्षमा असावी" ज्योतिषाने राजास म्हटले. राजाच्या हृदयाचे ठोके जलद पडू लागले.
"काय झालं ?" तो चिंताग्रस्त चेहर-याने विचारता झाला.
"राजपुत्राचे दोन्ही पाय निकामी होणार आहेत !"ज्योतिषाकडून उत्तर मिळाले. कानात धातूचा तप्त रस ओतल्यासारखे ज्योतिषाचे ते शब्द राजाच्या कानी पडले. मुखावरचा आनंद क्षणात मावळला. तेथे उपस्थित सर्व नरेशांची तीच अवस्था झाली. सर्वांनी हळहळ प्रकट केली.
तेथेच असलेल्या राज-ऋषींच्या चेह-यावर मात्र क्रोध प्रकटला. राजाविषयी त्यांना जिव्हाळा होता. म्हणून राजपुत्राबद्दल ज्योतिषाने उद्गारलेले ते शब्द त्यांना रुचले नाहीत. त्यांच्या डोळ्यांत अग्नी पेटला अन् त्या अग्नीहूनही तप्त अशी शापवाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडली,
"राजाच्या मुखावर दुख: आणणा-या ज्योतिषा, राजपुत्राबद्दल अभद्र बोलून तू माणुसकीला काळिमा फासला आहेस...म्हणून तुला पुढील जन्मी माणूस म्हणून न जगता एक य:कश्चित प्राणी म्हणून जीवन व्यतित करावे लागेल !! राजपुत्राच्या पायांविषयी अभद्र बोलणार्‍या चान्डाळा, तुला पुढील जन्मी आठ पाय असतील !!! "
ती भयानक शापवाणी ऐकून ज्योतिषाला भय वाटू लागले. तो गयावाया करत म्हणाला,
"मुनिवर्य, मला माफ करा. भविष्यात जे काही आहे तेच मला सांगावे लागते म्हणून माझ्या मुखातून असे अभद्र बाहेर पडले. मी कधीच राजाचे अथवा राजपुत्राचे वाईट चिंतिले नाही. मला क्षमा करा...कृपया शाप मागे घ्या"
ऋषिंचा क्रोध एव्हाना मवळला होता. रागच्या भरात आपण भलतेच बोलून गेलो हे त्यांना समजले. ते म्हणाले,
"ज्योतिषा, क्रोधाच्या आहारी जाउन मी तुला शाप दिला. पण आता तो मागे घेणे अशक्य आहे. मी तुला उ:शाप देतो... ज्योतिषा, पुढील जन्मी जेव्हा तू आठ पायांचा प्राणी म्हणून जन्माला येशील तेव्हा तुझपाशी असलेली भविष्य सांगण्याची अचूक क्षमता कायम राहील. समस्त जनता तुझा उदो उदो करील. एखादा पराक्रम करणार्‍या व्यक्तीपेक्षा तो पराक्रम सांगणार्‍या तुझा जयघोष होईल !! तथास्तु "

[अतिशय महत्वाची सूचना : हा प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहे. वास्तवात असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी अथवा प्राण्याशी त्याचा संबंध जोडण्याचा फुका प्रयत्‍न करू नका !!]

12 comments:

  1. हाण तिच्या मारी, बोला ज्योतीषाचार्य श्री श्री श्री पॊलबाबा की जय..... ;-)

    ReplyDelete
  2. आणि मी तुला उ:शाप देतो की तु ऑक्टोपस नामक प्राण्याचे रूप धारण करून ऍक्वेरियम नामक भांड्यात जाऊन बसशील व पायाने लाथाडून खेळल्या जाणार्‍या खेळातील भविष्य तुला अचूक सांगता येईल.

    असं लिही की पुढे.

    ReplyDelete
  3. भारी रे..तर हे आहे काय बाबा पॉल च पोल(रहस्य) ...

    ReplyDelete
  4. @विशाल कुलकर्णी
    जय हो, जय हो !

    ReplyDelete
  5. @davbindu
    होय. (नुकतीच जन्मलेली) आख्यायिका आहे ही. !

    ReplyDelete
  6. पॉल रावांच्या सामर्थ्याचा शोध तू थेट त्याच्या मागच्या जन्मात जाऊन घेतलास की रे... सहीये.. जाम भारी ;)

    ReplyDelete
  7. आत्तापर्यंतचा सगळ्यांत जास्त आवडलेला लेख... सहीच आहे एकदम.

    ReplyDelete
  8. @संकेत आपटे
    धन्स ! माझंही असंच मत आहे.

    ReplyDelete