Sunday, 27 June 2010

माझी कथा लोकसत्तात !

पोस्ट खरं तर 'हास्यब्लॉग' वर लिहिण्यासारखी नाही...म्हणजे विनोदी वगैरे नाही ('नेहमी लिहितोस ते काय फार विनोदी वाटतं काय ?' असं मनात म्हणलात ते कळलं बरं का ! ) . पण माझ्याकडे दुसरा दैनंदिनी-ब्लॉग नाही म्हणून इथे लिहीत आहे.

माझी 'भेट!'.ही धक्कांतिका आजच्या लोकसत्तात प्रकाशित झाली. लोकरंग पुरवणित 'गोष्ट' या सदरात.

ही कथा मी पाच मार्च ला पाठवली होती. नंतर अनेक रविवार वाट बघितली पण 'भेट' झालीच नाही. मला वाटलं एक तर ती पोहोचली नसेल नाहीतर त्यांना आवडली नसेल. आणि त्यांनी कथा स्वीकारली का नाही हे कळायला पण मार्ग नव्हता. कारण मी माझा जुना horizondesai@gmail.com' हा आयडी दिला होता. तो आता बंद आहे. (ते सुद्धा फाजील पणामुळे. त्या आयडिवर माझं दुसरं गूगल अकाउंट मर्ज करण्यासाठी आधी तो डिलीट केला. आणि नंतर त्याच नावाने साइन अप करताना कळलं की गूगल ईमेल आयडी रिसायकल करत नाही ! :( )

तर ती कथा आज प्रकाशित झाली. त्याला साजेसं सुंदर चित्रही छापलं आहे.



Tuesday, 15 June 2010

भवानी तलवार

'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा चित्रपट नक्कीच सगळ्यांनी पहिला असेल. मस्त पिक्चर आहे, मला आवडला.
पण त्यातला एक प्रसंग पाहताना मात्र (प्रसंग विनोदी नसतानाही) हसणं आवरता आलं नाही.

तर तो प्रसंग असा आहे:
दिनकर भोसले हा कथानायक, 'गोसालिया' या दुष्ट पात्रावर तलवार उगारून उभा असतो. आपल्याला वाटतं आता तलवारीचा वार होणार. पण दिनकर भोसले म्हणतो,

"महाराजांनी दिलेल्या तलवारीनं तुझ्यासारख्या भेकड आणि नीच माणसाचा खून करणार नाहीए मी"

फोटो सौजन्य : यु ट्यूब (आणि कीबोर्ड वरचे 'प्रिंट स्क्रीन' बटन)

म्हणजे ?? नीच माणसावर तलवार चालवायची नाही तर काय सज्जनांना कापून काढायचं ? !!

शिवाजी महराजांनी ज्या मोगल नि इतर लोकांना वर (इथे मी 'खाली' लिहिणार होतो, पण ज्याला युद्धात मरण येतं तो स्वर्गात जातो असं ऐकलय) पाठवलं ती लोकं नीचच होते की नाही. मग...

Monday, 17 May 2010

अचाट मोदी



सॉलिड बातमी होती आज सगळ्या पेपरांत. BCCI च्या 'कारणे दाखवा' नोटीसला मोदी यांनी बारा हजार पानी उत्तर दिले. खरंच अचाट ईसम आहे हा मोदी ! ३५ पानांच्या नोटीसला एवढं मोठं उत्तर ? इकडे मराठीच्या तासाला संदर्भासाहित स्पष्टीकरणाला १०-१२ ओळी लिहिताना आमची बोंबाबोंब व्हायची अन् हे बेणं पाठवतंय खोकिच्या खोकी भरून उत्तर !

आता केकता कपूर--सॉरी--एकता कपूरला नवीन सीरियल सुरू करण्याची नामी संधी आहे. 'कहानी क्रिकेट किंग की' (यातल्या क्रिकेटचं स्पेलिंग 'Kricket' बरं का) या नावाने सीरियल जाहीर करायची आणि त्यात ललित मोदींची 'छोटिशी' मुलाखत घ्यायची. १२००० हजार पानी उत्तरं देण्याची सवय असणार्‍या मोदींची ती मुलाखत रोज डेली सोपच्या धर्तीवर दाखवल्यास किती दिवस सुरू राहील याचा हिशोब करा !

बाकी ते उत्तर खरंच एवढं मोठं नसणार. मजकुराची लांबी वाढवायची ती जुनीच आयडिया आहे. त्यात लिहिलं असेल, "आम्ही बॉल खरेदी केले. त्याची क्वालिटी तपासण्यासाठी त्याचे टप्पे पाडून पाहिले. टप्पे असे पडले--टप टप टप टप....टप टप टप टप.....टप टप टप टप.....टप टप टप टप.....एन्"

बरोबर ना ?

Saturday, 15 May 2010

फाजिती

हा ब्लॉग सुरू केला तेव्हा उत्साहाने ब्लॉगवर साइट काउंटर टाकले होते. अर्थात फ्री काउंटर असल्याने त्या काउंटर देणार्‍या साईट ची लिंक त्याला होती. पण तेव्हा असलेल्या HTML च्या थोड्याफार माहितीवरून त्या कोड मधे काडी करून ती लिंक मी काढून टाकली. म्हटलं कोणाच्या तातश्रींना कळतंय ?

मग प्रत्येक पोस्ट नंतर काउंटर वर वाढत जाणार्‍या संख्येकडे पाहायला अभिमान वाटायचा. आपलं लिखाण (खूपच पांचट असूनही) कोणीतरी वाचतय ही गोष्ट मनाला सुखवायची. त्या काउंटर चा 'अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा' होताना पाहायची उत्सुकता होती.

आणि एके दिवशी घात झाला. फ्री काउंटरवाल्यांना कसे कोण जाणे माझी लबाडी समजली. त्या दुर्दैवी सकाळी ब्लॉग पहिला तर काउंटर दिसेना. त्या जागी Account Suspended. No Link Found असा रूक्ष मेसेज !

मग आज परत काउंटर लावायचा ठरवलाय. ब्लॉग वर अतपर्यंतच्या नोंदी आहेत १७ (अरेरे! एवढ्याच ?). म्हणजे एका नोंदीला किमान तीस जणांनी भेटी दिल्या असं म्हटलं तर संख्या होते सतरा त्रिक चोपन्न-नव्हे-एक्कावन वर एक शून्य = ५१०. आणि आधीच्या काउंटर ने ५०० चा आकडा क्रॉस केलेला नक्की आठवतोय. सो आता हा काउंटर ५१० पासूनच सुरू करतो.